teak

 वनशेतीमध्ये साग लागवडीचे तंत्रज्ञान


डॉ. विजय इलोरकर, डॉ. प्रशांत राऊत, प्रिया आत्राम, कृषि वनशेती संशोधन प्रकल्प, कृषि महाविद्यालय, नागपूर


साग वृक्ष भारत, ब्रम्हदेश, थायलंड, जावा, सुमात्रा, मलाया इत्यादी देशात आढळून येतो. महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अमरावती, नांदेड, वर्धा, यवतमाळ, ठाणे, धुळे, नाशिक, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरीत्या आढळून येतो.


साग हा अतिशय उत्कृष्ट इमारती लाकूड देणारा, उंच, सरळ वाढणारा, मध्यम डेरेदार पानझडी वृक्ष आहे. सागाचे लाकडामध्ये असणारा चिवटपणा, निरनिराळ्या कलाकुसरीच्या व कापीव कामाकरिता लागणारा

सोपेपणा, आकर्षक रंग व पाण्यामध्ये अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता, विविध किडी व रोग इत्यादीपासून स्वत:चे रक्षण करण्याची क्षमता या गुणवैशिष्ट्यांमुळे साग फार लोकप्रिय आहे.


जमीन व हवामान


सागाला खोलवर व पाण्याचा उत्तम निचरा असलेली जमीन लागते. चिबड जमीन मानवत नाही. जमिनीला आम्ल-विम्ल निर्देशांक ६ ते ८ च्या दरम्यान असल्यास व जमिनीमध्ये तुलनात्मकदृष्ट्या चुना व स्फुरदाचे प्रमाण जास्त असल्यास साग वृक्षाची वाढ चांगली होते. साग वृक्ष सरासरी ७५० ते ५००० मि.मी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात आढळून येतो.परंतु उत्तम वाढीसाठी व लाकडाच्या चांगल्या प्रतीसाठी वार्षिक सरासरी पाऊस १२५० ते ३००० मि.मी. योग्य ठरतो. साग १० अंश ते ४८ अंश सें.ग्रे. पर्यंत तापमानात वाढतो. ३५ अंश ते ३९ अंश सें.ग्रे. तापमानामध्ये उत्तम वाढ होते. साग हा तीव्र प्रकाशार्थी आहे. सावली मानवत नाही.

समुद्र सपाटीपासून १२०० मीटर उंचीपर्यंत साग वृक्ष आढळून येतो. समुद्र सपाटीपासून ६०० मीटर उंचीपर्यंत साग वृक्षाची वाढ चांगली झालेली आढळून येते.


साग रोपवाटिका तंत्र


सागाची रोपवाटिका तयार करण्यासाठी चांगले गुणधर्म असणाऱ्या झाडापासून परिपक्व झालेले बी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात गोळा करावेत. रोपवाटिकेमध्ये लावण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते.

सागाची बीजप्रक्रिया करण्याकरिता साधारणपणे पुढील पद्धती वापरण्यात येतात. यापैकी कुठलीही पद्धत वापरता येईल.

१) मे महिन्यामध्ये सागाचे बी २४ तास पाण्यात भिजवून नंतर कडक उन्हात ४८ तास वाळवतात. हीच क्रिया सतत ३ आठवडे केली जाते.

२) सागाचे बी शेण पाण्याच्या मिश्रणात एक आठवडा ठेवून नंतर पेरणीस उपयोगात आणतात.

३) साग फळाचे टरफल मऊ करण्यासाठी फळे आळी- पाळीने पाण्यात कुजविणे व सुकविणे ही पद्धत बहुधा वापरली जाते.

४) खड्डा पद्धतीमध्ये सागाचे बी आणि पालापाचोळा व शेणमातीचा आलटून पालटून एकावर एक असे थर देऊन खड्डा पूर्ण भरावा व या खड्ड्यात दररोज २१ दिवसापर्यंत पाणी टाकावे. २१ दिवसानंतर खड्ड्यातील बियाणे काढून पालापाचोळा वेगळा करून बियाणे स्वच्छ धुऊन घ्यावे. बियाणे सावलीत वाळवावे व नंतर पेरणीकरिता उपयोगात आणावे. सागाचे बियाणे २० मिनिटे तीव्र गंधकामध्ये बुडवून ठेवतात व पेरणीपूर्व

बियाणे पाण्याने धुऊन घेतात. सागाचे बी साधारणपणे १५ ऑगस्टपासून तीन ते चार आठवड्यापर्यंत पावसात १० सें.मी. च्या थरात सिमेंटच्या धक्क्यावर पसरून वाळवावे. लाकडी चोपण्याने हलकेच बडवून वरचे आवरण मोकळे करावे. त्यामुळे फळाचे कठीण कवच मऊ होण्यास मदत होते. उत्तम प्रक्रिया झाली की प्रत्येक फळावरील मखमली आवरण निघून जाऊन कठीण कवचावर उभ्या रेषा दिसू लागतात. चार छिद्रे मोकळी व स्पष्ट दिसू लागतात.

ज्या जमिनीवर रोपवाटिका तयार करावयाची आहे अशी जमीन प्रथम लोखंडी नांगराने व नंतर १ ते २ वेळा लाकडी नांगराने उभी-आडवी नांगरून भुसभुशीत करावी. त्यानंतर जमिनीस कुळवाची पाळी द्यावी. जमिनीतील सर्व ढेकळे फोडून जमीन सपाट करावी. अशा जमिनीत गादी वाफे करण्यापूर्वी शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे. अशा खताचे प्रमाण प्रत्येक वाफ्यात १० ते १२ किलो अथवा २ घमेले तरी असावे.

(वाफा १२ मी. लांब व १.२ मी. रुंद) पाण्याची सोय असल्यास अशा वाफ्यावर सागाचे बी एप्रिलच्या चौथ्या किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० ते १५ सें.मी. अंतराने ओळीत पेरावे. ३ ते ४ किलो प्रति वाफा या प्रमाणात बी पेरावे. पाणी द्यावे. पहिले पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. साधारणत: उगवण बी पेरल्यापासून २० ते २१ दिवसात पूर्ण होते. एक हेक्‍टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी १० मीटर x १ मीटर आकाराचे ५ ते ६ वाफे लागतील. पावसाळ्यात निंदणी खेरीज इतर कामे करावी लागत नाहीत. मात्र रोपाची वाढ अधिक जोमाने व्हावी असे वाटत असेल तर 0.१ टक्का

युरियाचे द्रावण फवारावे अथवा पाणी देताना युरिया पाण्यात मिसळावा. वाफ्यातील रोपे जर चांगली वाढली असतील तर ऑक्टोबर,डिसेंबर व एप्रिलमध्ये रोपांना पाणी द्यावे व वाढ चांगली नसेल तर ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी देऊन वाढ साधता येते. मात्र, मे महिन्यात शक्‍यतो पाणी तोडावे जेणेकरून रोपे दणकट बनतील व शेतात लावल्यावर जरी पाऊस त्वरित आला नाही तरी टिकाव धरू शकतील. अशाप्रकारे वाफ्यात तयार झालेल्या रोपांची मुळे खोलवर जातात. त्यामुळे रोपे उपटून नवीन क्षेत्रावर लावणे कठीण जाते. म्हणून कशा रोपांपासून स्टंप/जड्या तयार केल्या जातात. जड्या तयार करण्यासाठी सागाची रोपे मुळे न तुटता अथवा सालीला जखम न होता उपटणे जरुरीचे आहे. खोलवर गेलेली मुळे कापणे जरूर पडल्यास ३० सें.मी. खालून कापावीत म्हणजे स्टंप करावयाच्या भागाला इजा पोहचणार नाही. अशाप्रकारे उपटलेली रोपे एकत्र करून खोडाकडील १ सें.मी. व मुळाकडील २० ते ३० सें.मी. भाग ठेवून धारदार हत्याराने किंवा पात्याने सोटमुळे व केसासारखी बारीक उपमुळे छाटावी.अशा प्रकारच्या रोपवाटिकेसाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.


पॉलिथिन पिशवीत साग रोपे तयार करावयाची झाल्यास गादी वाफ्यावर बी पेरून चार पाने फुटल्यानंतर रोप हलकेच काढून पॉलिथिन पिशवीत लावावे. योग्य वेळी अशी रोपे लागवड क्षेत्रात लावावीत.


पॉलिथिन पिशवीमध्ये बी पेरूनही रोपे तयार करता येतात. यासाठी १५ x२५ से.मी. आकाराची पिशवी घेऊन एका पिशवीत साधारणत: ३ ते ४ बिया पेराव्यात. बिया ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी, मार्च महिन्यात पेराव्यात. फेब्रुवारी, मार्च महिन्यात बिया पेरल्यास पावसाळ्यात लागवडीसाठी लहान रोपे मिळतात.


साग लागवड-


साग लागवड १) सागजडी लावून, २) पिशवी रोपांची लागवड या दोन पद्धतीने करता येते.


१) सागजडी लावून लागवड


रोप वाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्‍यतो लगेच लागवड करावी. परंतु काही दिवसापर्यंत साठवण करावयाची झाल्यास जड्या सावलीत ठेवून त्यावर ओले आच्छादन घालावे. यामध्ये ओल राखण्यासाठी मधूनमधून पाणी शिंपडावे. हवामानाचा विचार करून कमी जास्त प्रमाणात पाणी शिंपडावे. जडी तयार केल्यापासून ८ ते १० दिवसातच तो लावावा. सागाची जडी लावताना एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर ऊब आहे तोवरच लागवड करावी.


लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत. खोडाचा भाग जमिनीच्या वर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी. सागजडीच्या तळाशी आणि आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा पाण्यामुळे मुळे कुजून रोप मरते. त्यासाठी लागवडीनंतर रोपांच्या भोवती पार जमिनीत घालून माती मुळांच्या दिशेने ढकलावी.


जडी पद्धती कमी खर्चाची असल्याने व त्याचा वाहतूक खर्च अत्यल्प असल्यामुळे जेथे पाऊस चांगला पडतो तेथे प्रामुख्याने सागजडी लावून लागवड करावी. लागवड केल्यानंतर पाऊस न पडल्यास जमिनीवरील

खोडाचा भाग मातीने हलकेच झाकून घ्यावा. म्हणजे उन्हाने खोड वाळून जाणार नाही.



२) पिशवी रोपांची लागवड


उन्हाळ्यात लागवड क्षेत्राम्ये ३० x३० x३० सें.मी. (लांबी xरुंदी xखोली) आकाराचे खड्डे करावेत. खड्डा भरताना पोयट्याची माती, १ ते २ घमेली चांगले कुजलेले शेणखत व पाण्याचा निचरा होण्यात अडथळा असेल तर काही प्रमाणात वाळू घालून खड्डा भरावा. पिशवी रोपांची लागवड पावसाळ्यात केव्हाही करता येईल. परंतु शक्‍यतोवर चांगला पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये लागवड करावी. लागवड करताना पिशवीतील मातीच्या गोळ्याला धक्का न लावता पॉलिथिन पिशवी काढून लागवड करावी. पिशवी फाडण्यासाठी धारदार ब्लेडचा उपयोग करावा. ढगाळ व उष्ण हवामान असताना केलेली लागवड अधिक यशस्वी होते. पाणी देण्याची व्यवस्था असल्यास पाणी द्यावे म्हणजे पुढील काही दिवस पाऊस पडला नाही, तर रोप तग धरू शकेल.


रोपांमधील अंतर


सागातील दोन रोपामध्ये त्याचप्रमाणे दोन ओळीमध्ये किती अंतर असावे हे प्रजाती, जमिनीचा प्रकार, विरळणीचा प्रकार, आंतरपिके या गोष्टी लक्षात घेऊन अंतर ठरवावे. जास्त अंतरावर साग लागवड केली तर

त्यामध्ये अन्नधान्याची पिके घेता येणे शक्य होते.


आंतरपिके


सागामध्ये आंतरपिके घेताना जमिनीचा मजदूर, रोपामधील अंतर पाण्याची व्यवस्था ऋतूजैविकी  इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात. साग ऋतूजैविकी मूलभूत पाहणी अशी -

१) डोळा फुगणे आणि वाढणे- ऑक्टोबर ते एप्रिल

२) डोळा फुटणे- फेब्रुवारी ते जानेवारी

३) पानगळ- थोड्या प्रमाणात - नोव्हेंबर ते जानेवारीचा मध्य, मोठ्या प्रमाणात - जानेवारी ते एप्रिलचा मध्य.

(दमट हवामानाच्या प्रदेशात झाडावरची पाने मार्च किंवा त्यानंतरही राहतात)

४) नवीन पालवी फुटण्याची सुरुवात मे-जून.

५) पर्णरहित अवस्था- मार्चचा मध्य ते एप्रिल.

६) फुलोरा सुरू होण्याचा काळ- जुलैचा पहिला आठवडा ते सप्टेंबर अखेर.

७) फुले उमलणे- ऑगस्ट ते नोव्हेंबर.

८) फळधारणा- ऑगस्ट ते नोव्हेंबर

९) फल पक्व होण्याचा काळ- जानेवारी ते मार्च.


देखभाल


रोपाची लागवड केल्यानंतर त्यांच्या जवळ वाढणारे तण काढणे जरुरीचे असते. तण काढण्याचे काम हे प्रथम वर्षी साधारणत: तणाची वाट पाहून जुलै, ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये करावे. इतर प्रजातींची झाडे झुडपे वाढत असतील तर ती काढून टाकावीत. दुसऱ्या वर्षी तणाची वाढ पाहून ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये खुरपणी करावी. त्यामागील मुख्य उद्देश जास्तीत जास्त जमिनीतील मूलद्रव्ये व सूर्यप्रकाश रोपांना मिळावा हाच असतो.

सागजडी लावून लागवड केली असल्यास एका सागजडीस एकापेक्षा अधिक फुटवे येण्याची शक्‍यता असते. लागवडीनंतर ऑक्टोबरमध्ये साधारण अधिक जोमदार वाढ असलेला फुटवा ठेवून इतर फुटवे

काढून टाकावेत.


लागवडीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी खोडाचे सर्व बाजूने फांद्या फुटण्यास सुरुवात होते. रोपाचे खोड सरळ व जोमदार वाढावे यासाठी बाजूच्या फुटव्याचे कोंब मार्च, एप्रिळ या दरम्यान काढून टाकावेत. मात्र, टोकांचे ६ ते ७ कोंब ठेवावेत.


रोपाची लागवड केल्यानंतर नवीन रोपवनात हुमणी अळीचा त्रास देखील संभवतो. ही अळी रोपाची कोवळी मुळे खाऊन टाकते व रोपास मारते. पाने सुकतात व गळतात. अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. तसेच १० टक्के फॉलीडॉल पावडर धुरळावी.


किडी खेरीज सागाचे पानावर भुरी, तांबेरा इत्यादी बुरशीजन्य रोग आढळून आहे आहेत. या भुरीमुळे, पानाचे प्रकाश संश्लेषण कार्य थांबते. पाने गळून पडतात व रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.रोगाची लक्षणे दिसताच त्यावर ३०० मेश गंधकाची पावडर सकाळी व सायंकाळी धुरळावी.


विरळणी :


साग लागवडीमध्ये विरळणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सागाची विरळणी करताना लक्षात घ्यावयाची तत्त्वे म्हणजे, काही झाडे उपटून टाकणे, इतर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्य मिळतील व त्याची जोमदार वाढ होईल या उद्देशाने केलेले नियोजन जमिनीमध्ये पाणी, अन्नद्रव्ये आणि झाडांना मिळणारा सूर्यप्रकाश हे मर्यादित असल्यामुळे यासाठी झाडा-झाडांमध्ये बरीच स्पर्धा असते. म्हणून ही स्पर्धा कमी करून योग्य त्या झाडांना वाढीसाठी वाव देणे यासाठी विरळणी करावी लागते.


उद्दिष्टे


१) वाढीची क्षमता ही सर्व क्षेत्रातील झाडामध्ये एक सारखी विभागली जावी.


२) जास्तीत जास्त इमारत लाकूड मिळवून, जास्तीत जास्त नफा मिळणे.


३) विरळणी केल्यामुळे वोस किंवा इतर साहित्यापासून आर्थिक फायदा.


४) विरळणी केल्याने वाशाची गरज भागवू शकते.


५) रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.


६) विरळणी केल्यामुळे, सूर्यप्रकाश जमिनीवर पडून सागाचा पालापाचोळा सडण्यास मदत होते.


 

उत्पादन


सागापासून दहा वर्षानंतर साधारण एका हेक्‍टरमधून १५०० ते १८०० फाटे मिळू शकतील.


टीप- साग वृक्षाची लागवड केल्याबरोबर शेतकऱ्यांची आपल्या ७/१२ च्या उताऱ्यावर वृक्ष लागवडीची संबंधित अधिकाऱ्याकडून नोंद करून घेतल्यास पुढे वृक्ष तोडण्यास व पास मिळण्यास फारशा अडचणी येत नाहीत.



---xxx ---


शेतकरी । मे-जून । २०२०



No comments:

Post a Comment