पानवेल लागवड तंत्रज्ञान
डॉ. दिलीप कठमाळे, डॉ. मनोज माळी, डॉ. सचिन महाजन कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली
पान हे भारतातील एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. पानवेल ही सदाहरित, बहुवर्षीय, एकलिंगी वेळ आहे. भारतामध्ये या पिकाची लागवड मुख्यत्वे खावूच्या पानावरून केली जाते. विशेषत: जेवणानंतर पान खाण्याची पद्धत असून त्यामुळे पचनास मदत होते. पानवेलीच्या पानात “ब' आणि 'क' जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मानवी शरीरातील मेंदू, हृदय आणि यकृत या इंद्रियांना पान पौष्टिक व बलवर्धक ठरलेले आहे. तसेच पानामध्ये मोठ्या प्रमाणात क्लोरोजेनिक आम्ल असल्यामुळे त्याचा उपयोग काही प्रमाणात कॅन्सर कमी करण्यासाठी होतो. पानवेल हे पीक नैसर्गिक छायेमध्ये, कृत्रिमरीत्या तयार केलेल्या किंवा नारळ, सुपारीच्या बागामध्ये घेतले जाते. एकदा लागवड केल्यावर नऊ ते पंधरा वर्षापर्यंत सातत्याने शेतकऱ्यास पैसा पुरवत त्याच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ते उपयोगी पडते.
महाराष्ट्रात हे पीक सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जात असून प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे तसेच पुणे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, धुळे, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर या
जिल्ह्यात सामावलेले आहे. पानवेल हे पीक प्रामुख्याने कपूरी जातीचा वापर करून खुल्या वातावरणात घेतले जाते. अलीकडे शेडनेटमध्येही लागवडीचे प्रयत्न होत आहेत.
हवामान :
पानवेलीसाठी थंड छाया, हवेत आवश्यक दमटपणा आणि जमिनीत सतत ओलसरपणा असावा लागतो तर ४० ते ७५ सें.मी. पर्यंत वार्षिक पर्जन्यमान लागते. या पिकास उष्ण व कोरडे हवामान, उष्णतामानात अचानक होणारे फेरफार, जोराचा वारा व अति थंडी मानवत नाही. तापमान १० अंश सें.ग्रे. च्या खाली गेल्यास वेलीस इजा होण्याची शक्यता असते. परिणामी वेलीची वाढ होत नाही, पाने लहान वेडीवाकडी होऊन आकसतात. शेंड्याची वाढ थांबते व काहीवेळा शेंडा मरतो देखील. तसेच तापमान ४० अंश सें.ग्रे. च्या वर गेल्यास वेळ वाढीचा वेग मंदावतो, शेंडे व पाने आकडतात, काही वेळा असे भाग जळण्याची शक्यता असते. पानमळ्यात एकंदरीत उबदार हवामान आणि आर्द्रता ६० ते ७० टक्क्याच्या दरम्यान असावी.
जमीन :
उंच टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीत पानमळा चांगला येतो. त्यामुळे अशा ठिकाणी पानमळा घेणे फायदेशीर ठरते. या पिकास सुपीक, उत्तम निचरा होणारी रेतीमिश्रीत गाळाची तांबडी मातीत तसेच साधारण चुनखडीयुक्त जमीन उपयुक्त आहे. निवडलेल्या जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. खोळ, काळी आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन पानमळा लागवडीसाठी निवडू नये. लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास अशा जमिनीत पानाचे पीक चांगले येते.
पूर्वमशागत :
एकदा लावलेला पानमळा त्याच ठिकाणी बरीच वर्षे राहत असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत होणे अत्यंत आवश्यक आहे. लागवडी अगोदर खरिपात हिरवळीचे अथवा द्रिदळ पीक व रब्बीत हरभरा या सारखी रब्बी फेरपालटाची पिके घेऊन त्यानंतर जमीन ३ ते ४ वेळी उभी आडवी खोल नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या
२ ते ३ पाळ्या देऊन ढेकळे बारीक करावीत. काडी-कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. हेक्टरी ४० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे आणि नंतरच पानमळा लागवडीसाठी जमिनीची आखणी
करावी.
जमिनीची आखणी
पहिली पद्धत : पानवेल लागवडीसाठी जमिनीची आखणी दोनपद्धतीने करतात. एक एकर क्षेत्राचे काटकोनात आडव्या जाणाऱ्या दोन मीटर रुंदीच्या पाय रस्त्याने (चमन) चार समान भाग करावेत व प्रत्येक उपभागात ३ मीटर लांब व १.५ मीटर रुंद असे ३६ वाफे तयार करावेत. प्रत्येक उपभागात १८ वाफ्यांचे दोन चिरे होतात.
प्रत्येक चिराच्या दोन्ही बाजूस रस्ता असतो. डाव्या बाजूस एक मोठा पाट काढावा. आडव्या आणि उभ्या वाफ्यातून एक मुख्य पाट न्यावा. या पाटातून प्रत्येक वाफ्यास बाजूने पाणी देण्यासाठी वाट काढावी, वाफ्यांच्या दुसऱ्या बाजूस पाण्याच्या निचऱ्यासाठी केडग करावा. या वाटा एका आड एक कराव्यात, चराने निचरून आलेले पाणी एका मोठ्या पाटात एकत्र करावे.
दुसरी पद्धत : जून महिन्यात एक एकर क्षेत्राचे काटकोनात आडव्या जाणाऱ्या दोन मीटर रुंदीच्या पाय रस्त्याने चार समान भाग करावेत. प्रत्येक भागात सहा मीटर लांब व सव्वा मीटर रुंदीचे वाफे तयार करावेत. वाफ्याच्या दोन्ही बाजूस ५० सें.मी. रुंदीचा चर काढावा.
पाण्याचा निचरा वाढविण्यासाठी चारही बाजूने चर काढावेत. या पद्धतीने पानवेलीची लागवड केल्यास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देता येते.
मंडप :
बांगला, मिठापान, मघई या जातींची लागवड बंदिस्त पद्धतीने करतात. त्याकरिता मांडव पद्धतीचा वापर केला जातो. मांडव तयार करण्यासाठी परंपरागत पद्धतीने बांबू, बल्ली व गवत याचा उपयोग करतात. लोखंडी खांब व तार वापरून मांडव केल्यास त्यास वरचेवर दुरुस्ती लागत नाही.
शेवरी, शेवगा यांची लागवड :
पानवेल हे अत्यंत नाजूक पीक आहे. त्यासाठी सावलीची गरज असते. वेलीच्या शेंड्याची (छाट) लागवड करण्यापूर्वी सावलीसाठी व आधारासाठी शेवरी, शेवगा या वनस्पतींची लागवड करावी. आखणी झाल्यानंतर जून किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या वनस्पतीच्या बियांची लागवड करावी. पहिल्या पद्धतीने लागवड करण्यासाठी वाफ्याच्या लांबीच्या बाजूस शेवगा बियांची टोकण पद्धतीने पेरणी करावी. शेवग्याच्या दोन झाडांमधील अंतर ६० सें.मी. ठेवावे. त्याचवेळी शेवरीच्याही एक दोन बिया शेवग्याच्या बियांबरोबर टोकाव्यात व वेल व्यवस्थित वाढीस लागल्यानंतर शेवरीची दोन रोपे हप्त्यात काढून टाकावीत.
दुसऱ्या पद्धतीत शेवग्याच्या बियांची टोकण सरीच्या मध्यावर ६० सें.मी. अंतरावर करावी. शेवग्याच्या विरुद्ध बाजूस १ मीटर अंतरावर शेवरीच्या बियांची टोकण करावी. या पद्धतीने लागवड करून पाणी देण्यासाठी लगेच ठिबक सिंचन सेट बसविल्यास सुरुवातीपासूनच पाणी व्यवस्थित देता येते.
जाती
१) बांगलावर्गीय : या वर्गातील पानांमध्ये वेगवेगळे ३५ प्रकार असून यामध्ये देशी बांगला, कलकत्ता बांगला, घाणेघाटी, अमाईल या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या जाती आहेत. या जातीची पानवेली जोमाने वाढतात, पानाचा देठ लहान असते. पानांचा आकार मोठा असून रंग फिकट हिरवा व त्याला पिवळसर छटा असते. पान चवीला जास्त तिखट असते.
२) देशावरी : या जातीमध्ये चार वेगवेगळे प्रकार असून ते देशी देशावरी, मोहबा देशावरी, मालवी देशावरी आणि करुबाळी या नावांनी ओळखले जातात. या जातींची पाने मोठी, लंब गोलाकार, आखूड टोकाची आणि चवीला मध्यम गोड असतात.
३) कपूरी : व्यापारी तत्त्वावर जवळजवळ २५ कपूरीचे प्रकार आहेत. महाराष्ट्रात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पानांची मध्यम वाढ, टोकाकडे निमुळती होणारी आखूड पाने, फिकट पिवळसर ते फिकट हिरवा रंग, कमी दशी व तिखटपणा ही कपूरी पानांची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
४) कृष्णा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून कपूरी पानाच्या जातीमधून निवड पद्धतीने कृष्णा पान ही जात विकसित करण्यात आली आहे. या जातीची पाने जाड व मोठी, आकाराने लंबगोल, शेंड्याकडे निमुळती व आकर्षक असतात. पानांचा टिकाऊ पणा किमान १७ दिवस असतो. इतर जातींपेक्षा या जातीपासून २७ टक्के अधिक उत्पादन मिळते.
याव्यतिरिक्त मिठा पान, कालीपत्ती, मघई यासारख्या या विविध जातींची लागवड केली जाते.
पानवेलीची लागवड :
पानवेलीची लागवड बेण्यापासून करावी लागते. साधारणपणे ३ ते ४ वर्ष वयाच्या वेलीचे शेंड्याकडील ४५ सें.मी.
लांबीचे चार पेराचे व ५ ते ६ पाने असलेले रसरशीत फाटीदार जोमदार बेणे निवडावे. आधारासाठी लावलेल्या शेवगा, शेवरी या झाडाची उंची दोन ते अडीच फूट झाल्यानंतर पावसाची रिमझिम चालू असताना ऑगस्ट महिन्यात वेलींची लागवड करावी. शेवरीच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस २५ ते ३० सें.मी. लांब, ८ ते १० सें.मी.
रुंद व १० सें.मी. खोल चर तयार करावा. त्यात चांगले वाळलेले शेणखत टाकावे. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात व्यवस्थित बसवावा व वर माती घालून पायाने चांगले दाबावे. दोन वेलीतील अंतर ६0 सें.मी. ठेवावे. वेल लावताना कांड्यावरील मुळे जमिनीकडील बाजूस येतील याची काळजी घ्यावी.
निवारा :
पानवेलीचे ऊन, वारा व थंडीपासून संरक्षण होण्यासाठी तसेच वेलीच्या वाढीसाठी आर्द्रतायुक्त उबदार वातावरण निर्मिती होण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी पानमळ्याच्या चारही बाजूस ताट्या (फेन्सिंग) बांधून निवारा करावा. त्यासाठी वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट किंवा नारळाच्या झावळ्यांचा उपयोग करावा. ताट्यांची उंची ७ फुटांपर्यंत असावी. ताट्यांच्या आतील बाजूस तुतीचे छाट लावावेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ताटीच्या बाहेरील बाजूने हत्ती गवताचे ठोंब लागण करावेत. त्यामुळे ताट्यांना मजबुती येते, ताट्या वाऱ्याने पडत नाहीत. त्याचप्रमाणे पानाच्या बांधणीसाठी केळीच्या सोपाची अत्यंत गरज असते. त्यामुळे पानमळ्यात केळी असणे महत्त्वाचे ठरते. केळीचे ठोंब ताट्याच्या आतील बाजूस प्रत्येक २० फूट अंतरावर लावावेत. चमनमध्ये जागा असल्यास एक दोन ठिकाणी केळीचे ठोंब लावावेत.
आंतरमशागत :
१) पानवेलीची लागण केल्यानंतर वर्षातून दोनदा खुरपणी करून १ ते २ वेळा वाफ्यातील माती वेलीच्या बुंध्याला लावावी म्हणजे पाणी सारखे बसते.
२) वेलीची बांधणी वेळेत करावी. वेलीची जसजशी वाढ होत जाईल तसतशी शेवगा या आधार वृक्षाच्या खोडाला सुकलेले पाणकणीस किंवा लव्हाळ्याने सैल बांधणी करावी. वेळीच बांधणी न झाल्यास मंड पडून वेल मोडतात व वाळून जातात. वर्षातून साधारणत: १० ते १२ बांधण्या कराव्या लागतात.
३) सावली कमी करणे : पानाची गुणवत्ता चांगली मळण्यासाठी शेवगा व शेवरी यांच्या फांद्या छाटणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात १०० टक्के, हिवाळ्यात ४० टक्के व पावसाळ्यात १५ ते २० टक्के सावली ठेवावी.
४) माती घालणे : जमिनीचा पोत टिकून चांगल्या प्रतीची पाने मिळण्यासाठी वर्षातून दोन वेळा माळरानाच्या तांबड्या मातीचा पहिला हप्ता हेक्टरी ४० टन इतका पावसाळा संपल्यावर व दुसरा हप्ता भरणीच्या अगोदर एक महिना वाफ्यात वापरावा. काळी किंवा नदीकाठची पोयट्याची माती पानमळ्यात वापरू नये. डोंगराच्या पायथ्याशी असणारी माळरान जमिनीतील माती या कामी योग्य ठरते.
५) पानवेलीस पाणी देणे : पानवेलीस पाणी प्रवाही सिंचन पद्धत व ठिबक सिंचन पद्धत या दोन पद्धतीने देतात.
१) प्रवाही सिंचन पद्धत : या पद्धतीत पावसाळ्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळ्यात गरज भासल्यास, हिवाळ्यात १० तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. या पद्धतीने वाफ्यांना भरपूर पाणी दिले जाते व वेलीच्या गरजेपेक्षा बऱ्याचदा ते जास्त होते, त्यामुळे पाणी तर वाया जाते. परंतु मूळकुजव्या व इतर रोगांचे प्रमाण वाढते व चांगली पाने कमी प्रमाणात मिळतात.
२) ठिबक सिंचन पद्धत : वेलीस पाणी देण्यासाठीही पद्धत अत्यंत फायदेशीर आहे. यात पाण्याची ५० टक्के बचत होऊन ४० टक्के उत्पादन वाढते. तसेच पानाची गुणवत्ता चांगली मिळते व मूळकूज रोगाचे प्रमाण फारच कमी राहते.
६) वेलीची बांधणी : वेलीची जसजशी वाढ होत जाईल तस तसे तिची शेवगा अथवा शेवरीच्या खोडाला सुकलेल्या पानकणसाच्या पानाने किंवा लव्हाळ्याने सैल बांधणी करावी. बांधणी कुशल मजुराकरवीच करुन घ्यावी. वेळीच बांधणी न केल्यास मंड पडून वेल वाकून मोडतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान होते. कपूरी जातीसाठी वर्षातून अशा १० ते १२ बांधण्या कराव्या लागतात.
वेलीची उतरण :
जानेवारी ते मे दरम्यान एकदाच वेलीची उतरण केली जाते तर जुनवान पानमळ्यात ती जून महिन्याच्या दरम्यान केली जाते. वेलीची उंची ४ ते ५ मीटर झाल्यानंतर चांगल्या गुणवत्तेची पाने मिळत नाहीत. पानांची संख्या वाढते व आकार लहान राहतो, त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत नाही. म्हणून पानवेलीची उतरण
करणे गरजेचे ठरते. उतरणीच्या आठ दिवस अगोदर काबेडॅन्झिम ०.१ टक्क्याची फवारणी करावी व उतरण करताना वाफ्यात लांबीच्या बाजूने १५ सें.मी. रुंद व २० सें.मी. खोल चर खोदावा. मात्र, त्यामध्ये शेणखत/कंपोस्ट खत न वापरता करंज पेंड १० लीटर पाणी या प्रमाणात आळवणी द्यावे. वाढलेली संपूर्ण वेल सोडवून ती इंग्रजी ८ आकारात वळवून कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता पहिल्या उतरणीच्या वेळी शेंड्याकडील ७५ सें.मी. चुंबळ वर ठेवून बाकीचा पाव भाग चरामध्ये दाबावा व लगेच पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन :
पानवेलीस सेंद्रीय व रासायनिक खते दिली जातात. रासायनिक खते उदा. युरिया दिल्यास पानाचे उत्पादन वाढते पण पाने साठवणुकीत फार काळ टिकत नाहीत. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी, पानाचे भरपूर उत्पादन मिळण्याकरिता आणि पानाचा टिकाऊपणा वाढावा म्हणून २०० किलो नत्र शेणखतातून किंवा निंबोळी पेंडीतून वर्षातून दोन वेळा द्यावे. पहिला १०० किलो नत्राचा हप्ता जून महिन्यात किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीस व उरलेला १०० किलो नत्राचा दुसरा हपता नोव्हेंबर महिन्यात वेलीच्या चुंबळीजवळ लहानसा चर काढून द्यावा तसेच पानवेलीवर उतरणीपासून ६०दिवसाच्या अंतराने तीन वेळा ०.४ टक्के झिंक सल्फेट आणि 0.१ टक्के मॅगनीज सल्फेट फवारावे तसेच बायोझाईम/ट्रायकॉन्टॅनॉल/सायटोझाईम या संप्रेरकाच्या ०.०५ टक्के तीव्रतेच्या तीन फवारण्या पावसाळ्यानंतर प्रत्येकी ३० दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. शक्यतो पानमळा लागवडीसाठी सेंद्रीय खतांचाच वापर करावा. रासायनिक खतांचा वापर करू नये. रासायनिक खतांचाच फक्त वापर केल्यास रोगाचे प्रमाण वाढून पानमळ्याचे आयुष्य कमी होते.
पानवेलीकडून चांगल्या गुणवत्तेची पाने मिळवण्यासाठी-
१) पानमळ्यात आंतरमशागत वेळेवर करावी.
२) पानवेलीस माफक व योग्यवेळी वाफा किंवा ठिबक पद्धतीने पाणी द्यावे.
३) वेलीची उतरण जानेवारी ते मार्च व जुनवान पानमळ्याची उतरण जून महिन्यात काळजीपूर्वक व कुशल मजुरांकडूनच करावी.
४) पानमळ्यात पानाचे भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा.
५) वेलीची बांधणी वेळेवर करावी.
६) पानाची गुणवत्ता व टिकाऊपणा वाढविण्यासाठी बायोझाइम/ ट्रायकॉन्टॅनॉल/सायटोझाइम सारख्या संजिवकाचा गरजेनुसार वापर करावा.
७) पानास चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी पानाची काढणी योग्य वेळेला करावी.
८) पानाचा टिकाऊपणा व रसरशीतपणा राहण्यासाठी पाने विक्रीस बाजारला पाठविताना व्यवस्थित पॅकिंग करून पाठवावीत.
९) पाने कीड व रोगापासून मुक्त असावीत.
पानाची काढणी :
वेलीवरील पानांची काढणी योग्य वेळी करावी, वेळीवर नवीन पाने फुटल्यावर ३५ ते ४० दिवसांनी काढणीस तयार होतात. पण ती तशीच पुढे ठेवून ६० ते ९० दिवसांनी काढणे चांगले कारण ती जास्त काळ टिकतात व त्यांना दरही चांगला मिळतो. पानांची काढणी दर १५ दिवसांची करावी. हे करताना योग्य आकाराची, जाडीची तसेच योग्य प्रमाणात देठ ठेवून काढणी करावी. तसेच पानांच्या खुड्यानंतर पानाचे आयुष्यमान वाढावे. यासाठी ओलसर काढाच्या आच्छादनाचा वापर करून केलेल्या बांबूच्या करंड्यामध्ये पानाची बांधणी केल्यास पाने जास्त काळ टिकतात. एका बांबूच्या करंडीत १५०० ते ३०००, डप्यात ६००० तर डागात १२००० पाने असतात. फापडा आणि कळी अशा दोन प्रकारच्या पानांची काढणी करून ती बाजारात आणली. हेक्टरी ५०० ते ६०० डाग उत्पादन मिळते.
मर रोग व्यवस्थापन/नियंत्रण-
१) लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. काळी व पाण्याचा निचरा न होणारी भारी जमीन निवडू नये.
२) वेलींची उतरण ही कुशल मजुरांकडूनच करून घ्यावी.
३) उतरणीच्या वेळी वेलींच्या मुळांवर तसेच शेवगा व शेवरीच्या मुळावर असणाऱ्या सूत्रकृमींच्या गाठी चर काढत असताना वेचून जाळून नष्ट कराव्यात.
४) उतरणीच्या वेळी चरात लिंबोळी पेंड किंवा करंजी पेंडीचा वापर करावा व चरात ट्रायकोडर्मा प्लस जैविक बुरशी नाशकाची हेक्टरी ५ किलो मात्रा घेऊन आळवणी करावी.
५) पानमळ्यातील स्वच्छतेबरोबरच हेक्टरी ५ किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा प्लस जैविक बुरशी शेणखतात मिसळून मातीत मिसळावे.
भुरी :
थंडीच्या दिवसात कॅलिक्झीन ५ मि.ली. अथवा पाण्यात मिसळणारे गंधक (८० टक्के) २० ग्रॅम प्रति १० ली. पाण्यातून गरजेनुसार फवारावे.
करपा :
वेली उतरणीपूर्वी एकदा व पावसाळ्याच्या सुरवातीस ०.४ टक्के बोर्डो मिश्रण फवारावे किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम अथवा काबँर्डॅन्झिम १० ग्रॅम प्रति १० ली. पाण्यात मिसळून फवारावे. रोगट पाण्याचा वेळोवेळी जाळून नायनाट करावा.
अन्नद्रव्याची कमतरता : यामुळे पानांची टोके व कडा जळतात/ करपतात. याच्या बंदोबस्तासाठी सल्फेट ऑफ पोटॅशची (एसओपी) ५० ग्रॅम मात्रा प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा पानमळ्यात (एसओपी) खत पावसाळ्याच्या सुरवातीस व ऑक्टोबरमध्ये द्यावे.
कीड व्यवस्थापन
नुशी :
वेलीची उपद्रवास बळी पडलेली पाने त्यावरील नुशीच्या पिल्लासह काढून नष्ट करावीत.
पाने खाणारी अळी : ही कीड रात्रीच्या वेळी जास्त क्रियाशील असल्याने नियंत्रणास अवघड जाते. म्हणूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे फायद्याचे ठरते.
१) अंडीपुंज व नवजात अळ्यांचा समूह नष्ट करावा.
२) स्पोडोलूरचा वापर करून हेक्टरी ५ फेरोमन सापळे लावावेत.
३) रात्रीच्या वेळी पानमळ्यात २०० वॅट विजेचा बल्ब सूर्यास्तानंतर चार तास सुरू ठेवून त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याचे भांडे ठेवावे. त्यामुळे दिव्याकडे येणारे पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतील.
फूलकिडे : पानमळ्यातील कचऱ्याची विल्हेवाट तत्परतेने लावावी. खुरपणी करून वेळोवेळी तणनियंत्रण करावे. या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच डायमिथोएट ३० टक्के इसी २० मि.ली. प्रति १० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कोळी : प्रादुर्भाव दिसताच डायकोफॉल १५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० ली. पाण्यात मिसळून फवारावे.
हुमणी : पानमळा लावण्यापूर्वी जमिनीची खोल उभी-आडवी नांगरट करावी आणि कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. पानमळ्याशेजारी कडुनिंब, बाभूळ यासारखे वृक्ष असल्यास काढून टाकावेत. पानवेलीची उतरण
करतेवेळी चरामध्ये मेटारिझीअम अँनिसोप्ली हे जैविक बुरशीनाशक हेक्टरी २० कि.ग्रॅ. या प्रमाणात मातीत मिसळावे.
सूत्रकृमी : उतरणीच्या वेळी मुळावरील सूत्रकृमीच्या गाठी खुडून त्या जाळून नष्ट कराव्यात. त्यानंतर १५ दिवसांची ट्रायकोडर्मा प्लस हेक्टरी २० किलो उतरणीच्या वेळी व नंतर प्रत्येकी दीड महिन्यांनी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात आळवणीसाठी वापरावा. झेंडू, सदाफुली, शेवंती यांसारखी फुलझाडे शकय तेथे वाफ्याच्या
बाजूने लावावीत. या शिवाय पानमळ्यात गोगलगायीचा सुद्धा प्रादुर्भाव पावसाळ्यात आढळतो. त्याकरिता १०० किलो गव्हाचा किंवा भाताचा कोंडा घ्यावा. त्यात ५ किलो गूळ -- १ किलो मिथोमील मिसळावे व प्रति हेक्टरी सदर मिश्रणाचे आमिष शेतात ठेवावे.
शेतकरी । मे-जून । २०२०
No comments:
Post a Comment