organic fertilizers

 

सेंद्रिय खते

वनस्पतींना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये

अ) मुख्य अन्न्द्रव्ये (अधिक प्रमाणात लागणारी) कर्ब, प्राणवायू आणि हायड्रोजन ही हवा आणि पाण्यातून मिळतात व नत्र, स्फुरद आणि पालाश ही जमिनीतून मिळतात.

ब) दुय्यम अन्नद्रव्ये (मध्यम प्रमाणात लागणारी) चुना, मॅग्नेशियम आणि गंधक जमिनीतून मिळतात.

क) सूक्ष्म अन्न्द्रव्ये (कमी प्रमाणात लागणारी) जस्त, लोह, मँगनीज, तांबे, मॉलीब्डेनेम, बोरॉन, क्लोरीन आणि सोडीयम जमिनीतून मिळतात.


खतांचे प्रकार :      (अ) सेंद्रिय खते व (ब) रासायनिक खते

(अ) सेंद्रिय खते : वनस्पती, प्राणी आणि जीवजंतू यांच्या अवशेषापासून मिळणाऱ्या खतास सेंद्रिय खत असते म्हणतात. या खतांमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण रासायनिक खतापेक्षा कमी असते, म्हणून यांची मात्रा फारच अधिक वापरावी लागते. ही खते पिकांना सावकाश लागू पडतात आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन जमिनीचा पोत सुधारतो तसेच जलधारणा शक्ती वाढते. त्याचप्रमाणे जमिनीच्या जैविक गुणधर्मात सुधारणा होते.


सेंद्रीय खतांचे प्रकार :

१) भरखते : शेणखत, कंपोस्ट, लेंडीखत

२) जोरखते : सर्व प्रकारच्या पेंडी, मासळी खत, शिंग आणि खुरांचे खत इत्यादी.


हिरवळीची खते : यात मुख्यत: झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतीचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. बोरु, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरुन जमिनीत गाडली जातात. याशिवाय गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादीच्या कोवळ्या फांद्या, पाने जमिनीत गाडून कुजविली जातात. करंज, गाजर फुली सारख्या या हिरवळीच्या खतामुळे जमिनीस सेंद्रीय पदार्थ पुरविले जातात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. शिवाय पीकपोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

गिरीपुष्प – उत्तम हिरवळीचे खत : गिरीपुष्प हे हिरवळीच्या खताचे अतिशय उपयुक्त पिक असून या पिकाची लागवड शेतीच्या बांधावर कलमाद्वारे करावी, किंवा बिया टाकून करावी. गिरीपुष्पाच्या कोवळ्या फांद्या व पाला पावसाळ्यामध्येय शेतात टाकल्यास कुजून त्यापासून मुख्यत: नत्र व सेंद्र‍िय पदार्थांचा पुरवठा होतो. गिरीपुष्पातून मिळणाऱ्या मुख्य अन्नद्रव्याचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

नत्र (N) ०.६ ते ०.७%, स्फुरद (PO) ०.१ ते ०.२%, पालाश (KO) ०.५ ते ०.६%


तक्ता क्र. १ : निरनिराळ्या सेंद्रिय खतातील (साधारणपणे) अन्नद्रव्याचे प्रमाण


अ.क्र.

सेंद्रिय खताचे नांव

नत्र %

स्फुरद %

पालाश %

१.

शेणखत

०.८४

०.६१

१.५६

२.

लेंडीखत

०.५

०.५–०.८

१.००

३.

कोंबडीचे खत

०.५

२.५

१.००

४.

डुकराचे खत

०.५५

०.५०

०.४०

५.

कंपोस्ट खत (सर्वसाधारण)





ग्रामीण

०.४-०.८

०.३–०.६

०.७–१.००


शहरी

१.२-२.०

१.००

१.००

६.

गांडूळ खत

०.५-१.०६

०.३-२.३०

०.१५–०.५०

७.

पेंडी खत, भुईमुगाची पेंड

७.१६

१.२२

०.९४

८.

करडईची पेंड

५.०१

१.६३

०.६३

९.

एरंडीची पेंड

४.५५

१.७२

०.७०

१०.

सरकीची पेंड (प्रक्रिया केलेली)

७.००

३.००

२.००

११.

करंज पेंड

४.००

१.००

१.००

१२.

निम पेंड

५.००

१.००

१.५०

१३.

मोहाची पेंड

२.५०

०.८०

१.८०

१४.

रक्तांचे खत

११-२४

०.८६

०.५४

१५.

मासळीचे खत

५.१५

(४ ते १०)

५.२०

(३ ते ४)

१.६३

--

१६.

हाडाचे खत

३.८८

२१.५६

--

१७.

ॲनिमल मील

८.५०

७.८०

--

१८.

खुराचे व शिंगाचे खत

१०-१५

१–०

--

१९.

उसाची मळी

०.२५

०.४–०.५

--

२०.

हिरवळीची खते (सरासरी)

०.५-०.७

०.१–०.२

०.८–१०.६


कंपोस्ट खते व ते तयार करण्याच्या विविध पध्‍दती

विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खताला अनन्यसाधारण असे स्थान आहे. कारण कंपोस्ट खत म्हणजे जिवाणूंच्या साह्याने शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या टाकाऊ स्वरुपाचा काडीकचरा, पानगळ, जनावरांची उष्टावळ व मलमूत्र यापासून कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय.

वनस्पतीजन्य व प्राणिजन्य स्वरुपाच्या टाकाऊ पदार्थापासून निर्माण केलेले कंपोस्ट खत जमिनीची सुपिकता व उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचे साधन आहे. अशा प्रकारे सेंद्रिय खते वापरले असता त्यातील अन्नद्रव्ये पिकांना सतत व हळुवारपणे उपलब्ध होतातच पण त्याशिवाय जमिनीत ह्युमस सारख्या प्रभावी घटकांचे प्रमाण वाढून त्यातून वनस्पतीच्या वाढीस उपयुक्त अशी इतर अन्नद्रव्ये निर्माण होण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारुन जलधारणा शक्तीत वाढ, हवा व पाणी यांचे योग्य संतुलन, तापमानाचे नियमन इत्यादी बाबींमुळे जमिनीच्या कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर अनुकुल परिणाम होऊन तिची एकंदर दुरगामी उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.


कंपोस्ट खताची निर्मिती : कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असून त्यात तौलनिकदृष्ट्या अनेक गुणदोष अंतर्भूत आहेत.


(१) इंदौर पद्धत किंवा ढीग पध्‍दत : यामध्ये शेतीतील काडीकचरा, मलमुत्र, इतर सेंद्रिय पदार्थ एकत्र करुन एक आड एक थरात पसरुन साधारणत: सहा फूट रुंद आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून जमिनीवर ५ ते ६ फुट उंचीपर्यंत रचला जातो. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकविला जातो. एक महिन्याच्या अंतराने मजुराच्या उपलब्धतेनुसार ढीग तीन ते चार वेळा  वरखाली करुन कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात. कुजण्याची क्रिया उघड्यावर ऑक्सीजनयुक्त वातावरणात होत असल्याने लवकर होते परंतु यामध्ये ओलावा लवकर उडून जातो व काही प्रमाणात अन्नद्रव्ये वायु रुपात वाया जातात. ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्यास मदत होते. तसेच अन्नद्रव्याचा ऱ्हास पण थांबवता येतो. अशा प्रकारे तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये सुमारे ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १.० टक्के स्फुरद, ०.८ ते १.८ टक्के पालाश आणि इतर दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात.


(२) बंगलोर पद्धत किंवा खड्डा पध्‍दत : यामध्ये ६ फुट रुंद, ३ फुट खोल व सोयीनुसार लांबी असलेला खड्डा तयार केला जातो. खड्डयाचा तळ व बाजू चांगल्याप्रकारे ठोकून घेतल्या जातात. त्यानंतर प्रथम ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला जातो. अशा क्रमाने खड्डा पूर्ण भरुन जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फुट उंचीपर्यंत भरुन माती व शेणकाल्याचे मिश्रण करुन लिंपून घेतला जातो. खड्डयात ओलावा टिकविण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडले जाते.

कुजण्याची क्रिया सुरुवातीस ऑक्सिजनयुक्त वातावरणात व नंतर ऑक्सिजन विरहित वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो त्यामुळे खत तयार होण्यास लागणारा कालावधी वाढतो, अर्थात ढीग पद्धतीच्या तुलनेत अन्नद्रव्याचे वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.

कुजण्याचा वेग चांगला राखण्यासाठी व कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्यासाठी खालील बाबी महत्वाच्या आहेत.

१. सेंद्रिय पदार्थामधील दगड, विटांचे तुकडे, कचरा, खिळे, प्लॅस्टिकचे तुकडे इत्यादी पदार्थ वेचून बाजूला टाकावे.

२. सेंद्रिय पदार्थांचे शक्यतो लहान लहान तुकडे (१५ ते २० सें.मी.) करुन थर द्यावा, त्यावर शेणकाल्याचे मिश्रण टाकावे.

३. शेणखतामध्ये प्रति टन उपल्बध सेंद्रिय पदार्थास अर्धा किलो या प्रमाणात कंपोस्ट तयार करणारे जिवाणू खत मिसळावे.

४. जनावरांचे मूत्र‍ किंवा अर्धा किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट व दोन किलो सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव मिश्रण करुन प्रत्येक थरात शिंपडावे.

५. या बरोबर जुने कुजलेले शेणखत चांगले वाळवून थरात विरजन म्हणून टाकल्यास कंपोस्ट खत कुजण्यास मदत होते.

६. खड्डयात सतत ओलावा राहील याची दक्षता घ्यावी.

७. अशाप्रकारे खड्डा भरुन खड्डयातील थर एक महिन्याच्या अंतराने शक्य असल्यास खालीवर करुन एकत्रित केल्यास ४ ते ५ महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते.

(३) नॅडेप पध्‍दत : या पध्‍दतीत जमिनीवर पक्क्या विटांच्या साह्याने १० फुट लांब, ६ फुट रुंद व ३ फुट उंच अशा आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाते. विटाच्या दोन थरानंतर तिसऱ्या थरात खिडक्या सोडल्या जातात. नंतर या टाक्यामध्ये सुमारे दीड टन काडीकचरा, १०० कि.ग्रँ. शेण व दीड टन चांगली चाळलेली जमिनीच्या वरच्या थरातील जिवाणुयुक्त माती भरली जाते.

   कंपोस्टची टाकी भरतानां प्रथम टाक्याचा तळ चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घ्यावा व त्यानंतर ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा व त्यावर सुमारे १०० लिटर पाण्यात ४ ते ५ किलो ग्रॅम शेण मिसळून शिंपडले जाते.

यानंतर साधारणत: अर्धा इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर देऊन परत पाणी शिंपडून ओला केला जातो. याचप्रमाणे पूर्ण टाकी भरली जाते व अधूनमधून पाणी टाकून टाकीत योग्य तो ओलावा (५० ते ६० टक्के) राखला जातो.

अशाप्रकारे टाकीमध्ये कुजण्याची प्रक्रिया सर्वच थरात ऑक्सिजनयुक्त वातावरणात जलद व सारख्याच प्रमाणात होते. त्याशिवाय कंपोस्ट तयार होत असतांना ओलावा तितक्या प्रमाणात उडत नाही आणि अन्नद्रव्याचा ऱ्हास पण होत नाही व ३ ते ४ महिन्यात उत्कृष्ट कुजलेले चांगले कंपोस्ट तयार होते.

कंपोस्ट खत तयार करतानां घ्यावयाची काळजी

1.  तयार केलेले कंपोस्ट खत चांगल्या प्रतीचे होण्यासाठी वापरण्यात येणारा काडीकचरा जनावरांच्या गोठ्यात ठेवला तर त्यात शेण व मूत्र मिसळले जावून खताची प्रत चांगली होते पण त्याशिवाय ते जलद कुजण्यास मदत होते.

2.  तूर, तीळ, कापसाच्या पराट्या, ज्वारीची धसकटे खड्डयात भरायची असतील तर ते भरण्यापूर्वी शक्य तितके लहान लहान तुकडे केले तर लवकर कुजतात.

3.  कार्बन व नत्राचे प्रमाण अधिक असणारे सेंद्रिय पदार्थ (लवकर कुजणारे ) उदा. गव्हाचे काड, भाताचे तणीस, भुईमुगाची टरपले इत्यादी पासून जर कंपोस्ट तयार करावयाचे असेल तर प्रत्येक थरात जनावरांच्या गोठ्यातील साठलेला मुत्राचा हलका शिडकावा करावा किंवा हे शक्य नसेल तर युरिया किंवा अमोनिया सल्फेटचे १.५ ते २.५ टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे जेणेकरुन त्यातील नत्राचे प्रमाण वाढून खत लवकर तयार होईल.

4.  कंपोस्ट लवकर कुजण्या करिता त्यात सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी.


(४) सुपर कंपोस्ट खत : रासायनिक खताच्या तुलनेत कंपोस्ट खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे ती वापरण्यास शेतकरी सहसा धजत नाहीत म्हणून त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढविण्याचे दृष्टिकोनातून विशेषत: स्फुरदाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रत्येक थरात १० ते १५ किलो सुपरफॉस्फेटचा थर देणे फायदेशीर आहे. यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खतालाच सुपर कंपोस्ट खत असे म्हणतात. यामुळे कुजण्याची क्रिया तर लवकर होतेच पण त्याचबरोबर स्फुरद तसेच नत्राचे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. कंपोस्ट खताचा दर्जा सुधारतो.

(५) ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्रज्ञान : मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. ऊस नेल्यानंतर शेतात भरपूर पाचट उपलब्ध होते आणि शेतकरी ते पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूचा नाश होतो. तसेच पाचटामधील अन्नद्रव्यांचा देखील नाश होतो व ऊसाच्या मुळाला उष्णतेची झळ बसल्यामुळे त्याच्या फुटव्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे पाचट कुजून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्र विद्यापीठाने विकसित केले आहे.

खोडवा ऊसामध्ये शेतातील पाचट खोडव्यातील सरीमध्ये समप्रमाणात पसरावे व त्यानंतर एकरी एक बॅग युरिया, एक बॅग सुपर फॉस्फेट, १० टन ऊसाची मळी व शेवटी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरावे. त्यानंतर खोडव्याच्या बगला फोडून माती पाचटावर पसरावी. काही पाचटे उघडी राहिल्यास पाणी देतांना उघडे पडलेले पाचट दाबून टाकावे. त्यानंतर पिकास नेहमीच्या पद्धतीने पाणी व खते द्यावी. ३-४ महिन्यात संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते.



Posted  by 

No comments:

Post a Comment