भात शेतीकरिता जैविक खत निळे हिरवे शेवाळ
डॉ. उषा रा. डोंगरवार, श्री. सुमेध रा. काशीवार, कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपूर
आजच्या परिस्थितीत रासायनिक खतांवर अवलंबून न राहता जैविक खताकडे वळणे गरजेचे आहे. निळे-हिरवे शेवाळ घरच्या घरी तयार करून त्याचा वापर खरीप हंगामामध्ये धान पिकाकरिता करून खतावरील खर्चात बचत करता येते. या शेवाळाचा वापर धान शेतीत केल्यामुळे जमिनीची सुपीकता सुध्दा वाढते. जमिनीचे गुणधर्म सुधारतात व त्याचा एकत्रित परिणाम धानाचे उत्पादन वाढीवर होतो.
धानशेतीला नत्र खत अत्यंत आवश्यक आहे. भारतात नत्राच्या एकूण उपयोगापैकी १/३ नत्र धान पिकासाठी वापरला जातो आणि धानशेतीत रासायनिक खतांद्रारे टाकलेल्या नत्रखतापैकी फक्त ३५ टक्के नत्र प्रत्यक्ष
पिकाला उपलब्ध होऊन उरलेला पूर्ण नत्र पाण्यावाटे झिरपून किंवा हवेत उडून जातो. अशा परिस्थितीत जास्तीतजास्त नत्राचा उपयोग करण्यासाठी धान शेतीत जिवाणू खतांचा वापर अत्यंत आवश्यक झालेला आहे. निळे-हिरवे शेवाळ हे जिवाणूखत धानशेतीसाठी फार उपयुक्त आढळून आले आहे. रासायनिक खतांच्या किंमतीशी तुलनात्मक दृष्टीने बघितल्यास कमी खर्चात जास्त फायदा मिळविण्यासाठी त्याचे तंत्रज्ञान समजून घेणे फार आवश्यक आहे.
निळे-हिरवे शेवाळ
ही एक सूक्ष्मदर्शीय, एकपेशीय तंतुमय शरीररचना असलेली गोड्या पाण्यातील स्वयंपोशी पाणवनस्पती आहे. काही निळे-हिरवे शेवाळ पाण्यात राहून हवेतील मुक्त नत्र 'हेटरोसीस्ट' या विशिष्ट शरीररचनेद्रारे जमिनीत
स्थिर करतात. निळे-हिरवे शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिरीकरणासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध झाल्यास ३० किलो नत्र/वर्ष/हेक्टर स्थिर करू शकते.
उपयोग/फायदे-
१) निळे हिरवे शेवाळ हवेतील मुक्त नत्र स्थिर करीत असल्यामुळे हेक्टरी २५ ते ३० किलो नत्र शेवाळामुळे धान पिकास मिळाल्याने नत्रयुक्त रासायनिक खतांच्या खर्चात बचत होते.
२) जमिनीत सेंद्रिय भर पडून जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते आणि जमिनीची सुपीकता वाढते व जमिनीची धूप कमी होते.
३) अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद काही प्रमाणात धान पिकास उपलब्ध होतो आणि वृद्धीसंप्रेरके व जीवनसत्त्व धान पिकास उपयोगी पडतात.
४) धानाच्या उत्पादनात वाढ होऊन धानाची प्रत सुधारते व दर हेक्टरी निव्वळ नफा वाढतो.
प्रमुख निळ्या-हिरव्या शेवळाच्या निवडक जाती-.
१) अनाबिना २) नोस्टॉक ३) अँलासिरा, ४) सायटोनिमा ५) सिलेंड्रोस्परम ६) ऑसिल्टोरिया.
जमिनीत नत्र स्थिर करण्याकरिता निळे-हिरवे शेवाळाकरिता आवश्यक घटक-
१) सूर्यप्रकाश-शेवाळाच्या वाढीसाठी प्रकाशाची आवश्यकता असल्यामुळे ते वरच्या ५ सें.मी. भागात आढळतात. अत्यंत कमी किंवा जास्त प्रकाशामुळे शेवाळाची वाढ व नत्र स्थिरीकरण मंदावते.
२) तापमान- शेवाळाच्या वाढीसाठी तापमान ३० ते ३५ अंश सें.ग्रे. योग्य असते. कमी तापमानामुळे शेवाळाची वाढ व नत्र स्थिरीकरण कमी होते.
३) पाणी- शेवाळाच्या वाढीसाठी धान खाचरात दोन इंच पाणी आवश्यक असते. कोरड्या जमिनीत शेवाळ वाढत नाही. पाण्यामुळे तापमान नियंत्रित राखले जाते.
४) जमिनीचा सामू- शेवाळाच्या वाढीसाठी उदासीन किंवा थोडा आम्लधर्मीय सामू चांगला असून ६.५ ते ७.० सामू असलेल्या जमिनीत नत्र कार्यक्षमरीतीने स्थिर केला जातो.
५) कीड व परोपजीवी कीटक- धान खाचरात गोगलगाय व शेवाळावर वाढणाऱ्या कीटकापासून तसेच काही जिवाणू, बुरशी व विषाणू पासून शेवाळाला उपट्रव होतो.
६) नत्र खते व सेंद्रीय खतांचा परिणाम- रासायनिक नत्र खतांमुळे शेवाळाची वाढ जलद होते. परंतु, नत्र स्थिर करण्याची कार्यक्षमता घटते तर सेंद्रिय खतामुळे शेवाळ चांगले वाढून नत्र स्थिरीकरण चांगले होते. सेंद्रिय व रासायनिक खतांचे योग्य प्रमाण असल्यास नत्र स्थिरीकरणांवर विशेष वाईट परिणाम होत नाही.
निळे हिरवे शेवाळखत तयार करण्याची पद्धत-
पूर्वी निळे-हिरवे शेवाळ प्रक्षेत्रावर तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध केले जात होते. परंतु सध्या उपलब्धता होत नाही अशा वेळी निळे शेवाळ घरचे घरी तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते स्वस्त उपलब्ध होईल व त्यांना लाभ घेता येईल. निळे-हिरवे शेवाळ खत स्वस्त असते. परंतु त्याची बाजारात उपलब्धता होत नाही. घरचेघरी तयार करावयाचे असल्यास पुढील पद्धतीनुसार तयार करावे.
भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी, सिमेंट किंवा लोखंडी पत्र्याचे पसरट टाके वापरता येतात. शेतात १ मीटर रुंद व २ मीटर लांब आणि २५ सें.मी. खोल वाफे तयार करावेत. त्यावर जाड पॉलिथिन कापड पसरवून त्यात चाळलेली माती १० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० ग्रॅम, युरिया १० ते २० ग्रॅम आणि सोडियम मॉलीबडेट २ ग्रॅम मिसळून पसरावे.नंतर वाफ्यात १० ते १५ सें.मी. पातळीपर्यंत पाणी भरून ढवळावे. ८ ते १० तासाने पाणी संथ होऊन तळाशी बसल्यानंतर पाण्यावर २५० ग्रॅम शेवाळाचे मातृसंवर्धन पसरावे. त्यानंतर पाणी ढवळू नये. आवश्यकतेनुसार पाणी देऊन पातळी कायम राखावी. भरपूर सूर्यप्रकाशात १० ते १२ दिवसातच पाण्यावर शेवाळ तरंगताना दिसेल. भरपूर वाढ झाल्यानंतर पाणी तसेच कमी होऊ द्यावे आणि सुकल्यानंतर शेवाळाच्या पापड्या जमा कराव्यात. नंतर वाफ्यात पुन्हा पाणी भरून २५० ग्रॅम शेवाळाची भुकटी पसरावी. अशा पद्धतीने एका वाफ्यातून २ ते ३ वेळा शेवाळाची वाढ केल्यास प्रत्येक वेळेस १.५ ते २ किलो प्रमाणे ८ ते १० किलो शेवाळ मिळेल. शेवटी वाफ्यातील संपूर्ण माती शेवाळासोबत खरडून मिसळून घ्यावी.
पाण्यात डास व अळ्यांची उत्पत्ती होऊ नये यासाठी मॅलॅथिऑन १ मि.ली. किंवा कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार २५ ग्रॅम वाफ्यात टाकावे. हे वाळलेले शेवाळ खत पोत्यामध्ये साठवता येते. हे तयार झालेले शेवाळ खत धानाची रोवणी झाल्यानंतर मुख्य शेतात वापरता येते. हे खत तयार करायला सोपे व स्वस्त आहे. उन्हाळी हंगामात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा भरपूर लाभ घेता येतो.
धानशेतीत निळे-हिरवे शेवाळ वापरण्याची योग्य पद्धत-
शेताची चिखलणी करून खतांची मात्रा दिल्यानंतर रोपांची लावणी करावी. खाचरातील गढूळ झालेले पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे लावणी नंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे हिरवे शेवाळ प्रति हेक्टर संपूर्ण शेतात सारखे पडेल अशा पद्धतीने पसरवून द्यावे. त्यानंतर पाणी ढवळू नये म्हणजे टाकलेल्या निळे हिरवे शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत व शेवाळाचे वाढीस आवश्यक सूर्यप्रकाश
जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचेल. शेवाळ टाकल्यानंतर २ ते ३ दिवस बांधीतील पाणी कमी होणार नाही तसेच बाहेर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी.
साधारणत: ३ ते ४ आठवड्यात जमिनीच्या पृष्ठभागावर शेवाळाची वाढ होऊन पाण्यावर तरंगताना दिसेल व अशा पद्धतीने तयार झालेले शेवाळ हवेतील मुक्त नत्र स्थिर करेल व स्थिर केलेला नत्र तसेच संजीवके रोपाला पुरविले जाऊन धानाची वाढ जोमदार होते व उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे जवळजवळ २० ते २५ टक्के नत्र खताच्या मात्रेची बचत होईल. सतत ३ वर्षे शेवाळाचा वापर केल्यास जमिनीत शेवाळ चांगला जम धरून जमिनीची सुपीकता कायम राखली जाते.
निळ्या-हिरव्या शेवाळाचा धान पीक व जमिनीवर परिणाम-
निळ्या-हिरव्या शेवाळाचा धान पिकाच्या उत्पादनावर व जमिनीच्या सुपीकतेवर काय परिणाम होतो. याबाबत सन १९९१ मध्ये राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प थारसा येथे प्रयोग घेण्यात आला. त्या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार २० किलो निळे-हिरवे शेवाळ अधिक ५० किलो नत्र (शिफारशीनुसार अर्धे नत्र) हे १०० किलो नत्र/हे. मात्रेबरोबर आढळले.त्यामुळे ५० किलो नत्राची बचत २० किलो निळे हिरवे शेवाळामुळे होऊ शकते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले.
सन २०१२ मध्ये त्रिभुवन विद्यापीठ काठमांडू येथे प्रयोग घेण्यात आला व त्या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार निळे हिरवे शेवाळामुळे ७ ते२०.९ टक्के धान्य तसेच ७.२ ते १८.१ टक्के तणस उत्पादन वाढलेले प्रयोगाअंती सिद्ध झाले.
निळ्या-हिरव्या शेवाळाच्या १० किलो किंवा २० किलो वापरामुळे धान व तणस यामधील नत्र शोषणाचे प्रमाण अनुक्रमे १६.२४ व २९.३५ टक्के वाढलेले आढळले.
विविध ठिकाणी घेतलेल्या प्रयोगावरून सुध्दा निळे हिरवे शेवाळाच्या वापरामुळे धानाच्या उत्पादनात वाढ झालेली आढळून आली आहे.
--//--
शेतकरी । मे-जून । २०२०
No comments:
Post a Comment